जैविक शेती काळाची गरज ?
जैविक शेती ही येत्या तीन ते पाच वर्षांमध्ये खरेच काळाची गरज असणार आहे. आपल्या वाडवडिलांनी जी शेती केली केमिकल्स न वापरता तशी आता आपण करत आहोत का?
मुळात ६०-७० वर्षांपूर्वी बाजारात कोणतेही रासायनिक खत किंवा विषारी कीटकनाशक नव्हतेच. त्या वेळी शेती ही पूर्ण शेणखतावरच केली जायची म्हणून तेव्हा जी धान्य, भाजीपाला, फळे मिळायची ती पौष्टिक असायची. ते अन्न खाल्ल्यानंतर मानवाच्या शरीराला आवश्यक घटक मिळायचे.
हे दुष्परिणाम आहेत रसायनांचे. आपण जो शेतात रसायनांचा वापर करतो यामुळे काय काय होते? सर्वात आधी माती खराब होते. मातीतील पोषक घटक कमी होतात. मातीतील जीव-जंतू नष्ट होतात व क्षारपाड, कडक, नापीक होण्याच्या मार्गावर जाते. तीच रसायने पाण्यात मिश्रीत होतात. त्यामुळे पाणी खराब होते, पाऊस पडल्यानंतर शेतात जी रसायने वापरली आहेत ते पावसाच्या पाण्याबरोबर वाहत जाऊन विहीर, ओढे, नाले, नदी, धरण या पाण्यात मिसळते. पशू, पक्ष्यांसह पेयजलावाटे ही रसायने आपल्या शरीरात जातात.
आजच्या आहारातून मानवाच्या शरीरास ज्या घटकांची गरज आहे ते घटक मिळत नाहीत. रसायनयुक्त आहार, पाणी, हवा यामुळे आज मानवाला वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. आज आईच्या दुधातसुद्धा विषारी कीटकनाशकाचा अंश आढळत आहे. लहानपणापासून जर हे विष मुलांच्या शरीरात गेले तर कशी निरोगी घडेल पुढची पिढी.
Comments
Post a Comment